Add parallel Print Page Options

ज्ञानी लोक येशूला भेटण्यास येतात

यहूदीयातील बेथलहेम गावात येशूचा जन्म झाला. त्यावेळी हेरोद राजा राज्य करीत होता. येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून काही ज्ञानी लोक यरूशलेमाला आले. आणि त्यांनी विचारले, “यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हणून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”

हे ऐकून हेरोद राजा तसेच यरुशलेम नगराचे रहिवासी घाबरुन गेले. मग त्याने यहूदी लोकांचे सर्व मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक यांना बोलाविले आणि विचारले की, “ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार होता?” त्यांनी उत्तर दिले, “यहूदीयातील बेथलेहेम गावात. कारण देवाच्या संदेष्टयांनी त्याविषयी असे लिहिले आहे की:

‘हे बेथलहेमा, यहूद्यांच्या भूमिप्रदेशा,
    तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही
कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील,
    असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल.’” (A)

मग हेरोदाने पूर्वेकडील ज्ञानी लोकांची गुप्तपणे भेट घेतली आणि तारा दिसल्याची नक्की वेळ माहीत करून घेतली. नंतर त्याने त्यांना बेथलहेमला पाठविले. हेरोद त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन त्या बालकाचा नीट शोध करा. आणि तुम्हांला ते सापडल्यावर मला सांगायला या. म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याला नमन करू शकेन.”

ज्ञानी लोकांनी राजाचे म्हणणे ऐकले व ते निघाले, त्यांनी जो तारा पूर्वेला पाहिला होता तोच त्यांना परत दिसला. ज्ञानी लोक त्या ताऱ्याच्या मागे गेले. जेथे बाळ होते ते ठिकाण येईपर्यंत तारा त्यांच्यासमोर जात होता. मग त्या ठिकाणावर तो थांबला. 10 ज्ञानी लोकांना ते पाहून फार आनंद झाला.

11 ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ व त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणलेल्या भेटवस्तु काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद व गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या. 12 पण देवाने स्वप्नाद्वारे त्या ज्ञानी लोकांना सावध केले आणि हेरोदाकडे परत जाऊ नका असे सांगितले. तेव्हा ते ज्ञानी लोक वेगळ्या मार्गाने आपल्या देशास परतले.

येशूचे आईवडील त्याला इजिप्तला घेऊन जातात

13 ज्ञानी लोक गेल्यानंतर, प्रभूचा दूत स्वप्नात येऊन योसेफाला म्हणाला, “ऊठ! बालकाला आणि त्याच्या आईला घेऊन निसटून इजिप्त देशास जा. कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे, तेव्हा मी तुला धोका टळल्याची सूचना देईपर्यंत इजिप्तमध्येच राहा.”

14 तेव्हा तो उठाला व रात्रीच बाळाला व त्याच्या आईला घेऊन इजिप्त देशास गेला. 15 आणि हेरोद मरेपर्यंत तेथेच राहिला. प्रभु देवाने संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते की, “मी माझ्या मुलाला इजिप्त देशातून बोलाविले आहे” [a] ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

बेथलहेमातील मुलांची हेरोदाकडून कत्तल

16 तेव्हा ज्ञानी लोकांनी आपल्याला फसविले, हे पाहून हेरोद अतिशय रागावाला. त्याने ज्ञानी लोकांकडून त्या बालकाच्या जन्माची वेळ नीट समजून घेतली होती. त्यानुसार बालक जन्मल्याला आता दोन वर्षे उलटली होती. म्हणून त्याने माणसे पाठवून बेथलहेम व त्याच्या आसपासच्या प्रदेशातील दोन वर्षाच्या व त्याहून कमी वयाच्या मुलांची कत्तल करण्याची आज्ञा केली. 17 यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे देवाने जे सांगितले होते ते अशा प्रकारे पूर्ण झाले. ते वचन असे होते:

18 “रामा येथे आकांत ऐकू आला.
    दु:खदायक रडण्याचा हा आकांत होता.
राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे,
    पण तिचे सांत्वन करणे अशक्य झाले कारण तिची मुले मरण पावली आहेत.” (B)

योसेफ आणि मरीया इजिप्तहून परत येतात

19 हेरोद मेल्यांनंतर प्रभुचा दूत स्वप्नात योसेफाकडे आला. योसेफ जेव्हा इजिप्तमध्ये होता तेव्हा हे घडले. 20 दूत म्हणाला, “ऊठ! बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा. जे लोक बाळाला मारू पाहत होते ते आता मेले आहेत.”

21 मग योसेफ बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास गेला. 22 हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याचा मुलगा अर्खेलाव यहूदाचा राजा झाला आहे असे जेव्हा योसेफाला समजले, तेव्हा तो तेथे जाण्यास घाबरला. पण स्वप्नात त्याला ताकीद मिळाल्याने तो तेथून निघाला आणि गालील प्रदेशात आला. 23 योसेफ नासरेथ नावाच्या गावात गेला आणि तेथे राहिला. ख्रिस्त नासरेथकर म्हटला जाईल, असे जे देवाने संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणूल हे झाले.