Add parallel Print Page Options

सिरीयावर संकट

यहुदाचा राजा आहाज हा योथामचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र. आहाजच्याकारकिर्दीत रसीन हा सिरीयावर राज्य करीत होता तर रमाल्याचा पुत्र पेकह हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन व पेकह हे दोघे यरूशलेमवर चाल करून गेले. पण त्यांना ते शहर काही जिंकता आले नाही.

“सिरीया आणि एफ्राइम (इस्राएल) यांच्या सैन्यांची एकजूट झाली आहे आणि त्यांनी एकत्र तळ ठोकला आहे,” असे दाविदच्या वंशजाला कळविण्यात आले. जेव्हा राजा आहाज ह्याला हा. संदेश कळला तेव्हा तो व त्याची प्रजा अतिशय घाबरून गेले. रानातील वृक्ष वाऱ्याने ज्याप्रमाणे कापतात तशीच भीतीने त्यांची स्थिती झाली.

तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू व तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा व त्याच्याशी बोला.

“आहाजला सांगा, ‘सावध राहा पण शांत राहा भिऊ नकोस. रसीन आणि रमाल्याचा पुत्र ह्यांना घाबरू नकोस. ते दोघे जळलेल्या काड्यांप्रमाणे आहेत. पूर्वी त्यांच्यात आग होती पण आता ते नुसते धुमसताहेत! रसीन, सिरीया आणि रमाल्याचा पुत्र हे खूप चिडले आहेत. त्यांनी तुझ्याविरूध्द कट केला आहे. ते म्हणाले, “आपण चाल करून जाऊ आणि यहुदाविरूध्द लढून यहुदा जिंकू. आपण आपापसात यहुदाची वाटणी करू आणि ताबेलाच्या पुत्राला यहुदाच्या गादीवर बसवू. असा त्यांचा बेत आहे.”’”

“पण त्यांचा बेत सिध्दीस जाणार नाही. असे काही घडणार नाही. असे माझा परमेश्वर प्रभू म्हणाला. आता एफ्राइम (इस्राएल) एक राष्ट्र आहे पण 65 वर्षांनी ते राष्ट्र म्हणून राहाणार नाही. तेव्हा, जोपर्यंत रसीन हा दमास्कसचा राजा आहे आणि एफ्राईमची (इस्राएलची) राजधानी शोमरोन येथे रमाल्याचा पुत्र राज्य करीत आहे तोपर्यंत, रसीन व रमाल्याचा पुत्र यांनी केलेला बेत सिध्दीस जाणार नाही. तू जर ह्या संदेशावर विश्वास ठेवला नाहीस तर तुझी लोकांनीही तुझ्यावर विश्वास ठेवू नये.”

इम्मानुएल-देव आमच्या बरोबर आहे

10 परमेश्वर आहाजशी बोलतच राहिला 11 परमेश्वर म्हणाला, “ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत हे सिध्द् करण्यासाठी तू काही निशाणी मागून घे. तू तुला हवी असलेली निशाणी माग. ती निशाणी पाताळातून येवो अगर आकाशातून.”

12 पण आहाज म्हणाला, “पुरावा म्हणून मी कोठलीही निशाणी मागणार नाही. मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही.”

13 तेव्हा यशया म्हणाला, “हे दाविदाच्या वंशजा, लक्षपूर्वक ऐक. तू लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहातोस. हे पुरेसे नाही म्हणून आता तू देवाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेस का? 14 तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वतःहून चिन्ह देईल:

त्या कुमारिकेकडे पाहा [a] ती गर्भवती आहे.
    ती मुलाला जन्म देईल.
    ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
15 इम्मानुएल मध व लोणी खाईल.
    अशा रीतीने जगत असतानाच ह्यातूनच तो चांगले करावे व वाईट सोडावे हे शिकेल.
16 पण तो चांगल्या वाईट गोष्टींतील फरक कळण्याइतका मोठा होण्याआधी एफ्राइम (इस्राएल)
    व सिरीया हे वैराण बनलेले असतील.
    तुला आता त्या दोन राजांची भीती वाटते.

17 “पण खरे म्हणजे तू परमेश्वराला भ्यायला पाहिजेस. का? कारण परमेश्वर तुझ्या वाट्याला काही काळ क्लेश देईल. ते क्लेश यहूदातून एफ्राइमच्या निघून जाण्याच्या वेळेप्रमाणे असतील, त्यानंतर असे क्लेश आताच तुमच्या वाट्याला येतील. तुझ्या वडिलांच्या वंशजांना आणि तुझ्या प्रजेला हे क्लेश सोसावे लागतील. देव काय करील बरे? देव अश्शूरच्या राजाला तुझ्याविरूध्द् लढण्यास भाग पाडील.

18 “त्यावेळी परमेश्वर ‘माशा’ व ‘मध माश्यांना’ बोलावील. 19 वाळवटांतील झऱ्याजवळच्या खडकाळ दऱ्यांत, झाडांझुडपांत व पाणथळ जागांत ते आपला तळ ठोकतील. 20 परमेश्वर अश्शूर देशाचा उपयोग यहुदाला शिक्षा करण्यासाठी करून घेईल. अश्शूर देशाला भाडोत्री म्हणून घेऊन त्याचा उपयोग वस्तऱ्याप्रमाणे केला जाईल. देव जणू काही ह्या वस्तऱ्याचा उपयोग करून यहुदाचे डोके, पाय भादरेल आणि त्याची हजामतही करील.

21 “त्यावेळी प्रत्येक माणूस एक कालवड व दोन मेंढरे पाळू शकेल. 22 त्या माणसाला पुरेल एवढे लोणी त्याला त्यांच्या दुधापासून मिळेल. देशातील प्रत्येक माणूस त्या वेळी लोणी व मध खाऊन राहील. 23 आता ह्या देशातील भूमीवर एक हजार द्राक्षवेली असलेले द्राक्षमळे आहेत. प्रत्येक द्राक्षवेलीची किंमत एक हजार चांदीची नाणी एवढी आहे. 24 पण हे द्राक्षमळे काट्यांनी व तणांनी भरून नष्ट होतील. ह्या भूमीत जंगल माजेल. व तिचा उपयोग शिकारीसाठीच होईल. 25 एकेकाळी ज्या टेकड्यांवर लोक शेती करून धान्य पिकवीत होते त्या टेकड्यांवर काट्याकुट्यांचे रान माजेल. कोणीही माणूस तिकडे फिरकणार नाही. फक्त मेंढ्या व गुरेढोरे तिकडे जातील.”

Footnotes

  1. यशया 7:14 त्या कुमारिकेकडे पाहा ह्याचा दुसरा अर्थ “त्या कुमारिकेकडे पाहा. ती गर्भवती होऊन तिला पुत्र होईल.” प्राचीन ग्रीक अनुवादावरून, ख्रि. पू. 150 च्या सुमारास केल्या गेलेल्या भाषांतरातून हा अर्थ घेतला गेल्याची शक्यता आहे.