Add parallel Print Page Options

16 यानंतर परमेश्वर हनानीचा मुलगा येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते. “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामच्या वाटेनेच गेलास. इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे. तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा मुलगा यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन. तुझ्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील. कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”

इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकीकत लिहीली आहे. बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा एला हा त्याच्यानंतर राज्य करु लागला.

तेव्हा परमेश्वराने येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वराला फार संताप आला होता. आधी यराबामच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामच्या कुळाचा संहार केला म्हणूनही परमेश्वराचा कोप झाला होता.

इस्राएलचा राजा एला

यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्विसावे वर्ष चालू असताना एला हा राजा झाला. एला हा बाशाचा मुलगा तिरसामध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.

जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता. 10 जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलचा राजा झाला.

इस्राएलचा राजा जिम्री

11 जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची हत्या केली. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले. 12 बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच बाशाच्या घराण्याचा उच्छेद झाला 13 बाशा आणि त्याचा मुलगा एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वतः पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे परमेश्वराचा कोप झाला.

14 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.

15 आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते. 16 जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता. 17 तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला. 18 नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले. 19 आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. यानेही यराबामप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.

20 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करुन उठला तेव्हाची हकीकतही या पुस्तकात आहे.

इस्राएलचा राजा अम्री

21 इस्राएलच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथचा मुलगा तिब्री याच्या बाजूचे असून त्याला राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते. 22 तिब्रीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्री मारला गेला आणि अम्री राजा झाला. 23 यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना अम्री इस्राएलचा राजा झाला. अम्रीने इस्राएलवर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता. 24 त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दीडशे पौंड चांदी देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगराचे नाव शोमरोन ठेवले.

25 अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने गैर गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता. 26 नबाटाचा मुलगा यराबाम याने जी पापे केली तीच यानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलवर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. दीडदमडीच्या दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.

27 अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकीकत इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे. 28 अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहाब हा राज्य करु लागला.

इस्राएलचा राजा अहाब

29 यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा मुलगा अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले. 30 परमेश्वराने जे चुकीचे म्हणून सांगितले होते, ते सर्व अहाबने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता. 31 नबाटाचा मुलगा यराबाम याने केले ते तर अहाबने केलेच, पण ते पुरेसे वाटले नाही म्हणून की काय त्याने आणखी ही दुष्कृत्ये केली. एथबाल याची मुलगी ईजबेल हिच्याशी त्याने लग्न केले. एथबाल हा सिदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बाल या दैवताच्या भजनी लागला. 32 शोमरोन येथे त्याने बालच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली. 33 अशेराच्या पूजेसाठी स्तंभ उभारला. आपल्या आधींच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.

34 याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले. [a]

Footnotes

  1. 1 राजे 16:34 नूनचा मुलगा … हे घडले यहोशवाने यरीहोचा विध्वंस केला तेव्हा तो म्हणाला होता की, जो पुन्हा हे नगर बांधील त्याचा सर्वांत मोठा आणि सर्वांत धाकटा अशी मुले प्राणाला मुकतील. पाहा यहोशवा 6:26.