Add parallel Print Page Options

यहूदाचा राजा योथाम

27 योथाम राजा झाला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा. ती सादोकची मुलगी. योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले वडील उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे वडील जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे दुर्वर्तन चालूच होते. परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले. यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले. अम्मोन्यांचा राजा आणि त्यांचे सैन्य यांच्यावर योथामने चढाई केली आणि त्यांचा पराभव केला. त्यामुळे पुढील तीनवर्षे अम्मोनी योथामला 3 3/4 टन चांदी, 62,000 बुशेल गहू (किंवा 10,000 कोर) गहू आणि तेवढेच जव दरवर्षी देत असत.

परमेश्वर देवाने सांगितल्याप्रमाणे मनःपूर्वक आचरण केल्यामुळे योथामचे सामर्थ्य वाढले. त्याने केलेल्या इतर गोष्टी आणि लढाया यांची हकीकत इस्राएल व यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. योथाम गादीवर आला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांशजारी दफन केले गेले. दाविदनगरांत लोकांनी त्याला पुरले. योथामच्या जागी आहाज हा त्याचा मुलगा राज्य करु लागला.